Warren Buffett : तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर वॉरेन बफे हे नाव ऐकलं नाही असं होणार नाही. हे फक्त नाव नसून गुंतवणूकदारांसाठी श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली आहे. जागतिक गुंतवणूक विश्वातील सर्वात मोठे आणि आदरणीय नाव, वॉरेन बफे आज ३१ डिसेंबर २०२५ रोजी 'बर्कशायर हॅथवे'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून अधिकृतपणे निवृत्त होत आहेत. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ जागतिक भांडवलशाहीला नवी दिशा देणारा हा ९५ वर्षीय महामेरू आज सक्रिय व्यवस्थापनातून बाजूला होत असल्याने एका सुवर्ण अध्यायाचा शेवट झाला आहे. उद्या, १ जानेवारी २०२६ पासून कंपनीचे विद्यमान व्हाइस-चेअरमन ग्रेग एबेल बर्कशायरचा कारभार स्वीकारतील.
कापड गिरणी ते जागतिक साम्राज्य!
बफे यांचा प्रवास हा आधुनिक अर्थव्यवस्थेतील एक चमत्कार मानला जातो. १९६२ मध्ये त्यांनी 'बर्कशायर हॅथवे' ही डबघाईला आलेली कापड गिरणी ७.६० डॉलर्स प्रति शेअर या दराने खरेदी करण्यास सुरुवात केली. आज याच कंपनीच्या एका शेअरची किंमत ७,५०,००० डॉलर्स (सुमारे ६ कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. बर्कशायर आज अमेरिकेतील ९ वी सर्वात मौल्यवान कंपनी असून ती १ ट्रिलियन डॉलर्सच्या (सुमारे ८४ लाख कोटी रुपये) साम्राज्यावर उभी आहे. इतकेच नाही तर ॲपल, कोका-कोला, अमेरिकन एक्सप्रेस आणि बँक ऑफ अमेरिका यांसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये बफे यांनी केलेल्या गुंतवणुकीने त्यांना 'ओमाहाचा जादूगार' हे नाव मिळवून दिले.
ग्रेग एबेल: नवे आव्हान, नवा वारसा
बफे यांचे उत्तराधिकारी ६३ वर्षीय ग्रेग एबेल २०१८ पासून कंपनीच्या बिगर-विमा व्यवसायांचे नेतृत्व करत आहेत. एबेल यांच्याकडे ३८० अब्ज डॉलर्सचा प्रचंड रोख साठा वारसा म्हणून मिळत आहे. व्याजदर कमी होत असताना या पैशाचे योग्य नियोजन करणे हे त्यांच्यासमोरील पहिले मोठे आव्हान असेल. निवृत्त झाले तरी बफे पूर्णपणे बाजूला जाणार नाहीत. ते 'बोर्ड ऑफ डायरेक्टर'चे चेअरमन म्हणून कायम राहतील आणि दररोज ऑफिसला येणार आहेत. नवीन गुंतवणूक शोधण्यात आणि एबेल यांना सल्ला देण्यात ते मदत करतील.
वाचा - पॅन कार्ड बंद होणार? आयटी रिटर्न भरला का? ३१ डिसेंबरपूर्वी उरका 'ही' कामे; अन्यथा रिफंडला मुकाल!
गुंतवणुकीचे 'तत्ववेत्ता'
बफे केवळ गुंतवणूकदार नव्हते, तर ते लाखो लोकांसाठी मार्गदर्शक होते. "जोपर्यंत तुम्हाला झोपेत पैसे कमवण्याचा मार्ग सापडत नाही, तोपर्यंत तुम्हाला मरेपर्यंत काम करावे लागेल," असे त्यांचे विचार जगभरात प्रमाण मानले जातात. आपल्या अफाट संपत्तीपैकी ६० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती त्यांनी आजवर दान केली आहे.
